
अमळनेरमध्ये वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; केटरिंग व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील फरशी रोडवर भरधाव वाळूच्या डंपरखाली चिरडल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुणाचे नाव घनश्याम तुकाराम पाटील (वय ३५, रा. देशमुख वाडा, पवन चौक, अमळनेर) असे असून ते केटरिंग व्यवसाय करीत होते. शहरात गॅसचा तुटवडा असल्याने ते लाकडांची व्यवस्था करण्यासाठी जळोद रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाकडे जात होते.
दरम्यान, फरशी रोडवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने घनश्याम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे देशमुख वाडा परिसरात शोककळा पसरली असून परिचित व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply