
जवखेडा येथे किरकोळ कारणावरून तरुणावर फायटरने हल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे ‘माझ्याकडे पाहून का हसत होता?’ असे म्हणत किरकोळ कारणावरून एका तरुणावर फायटरने हल्ला करून मारहाण केल्याची घटना १३ रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोर घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी वसंत पाटील हे १३ मार्च रोजी रात्री आपल्या शेतातून मोटरसायकलने घरी परतत होते. जवखेडा येथील बसस्थानकाजवळ ते पोहोचताच नितेश पंकज पाटील याने त्यांना अडवले. यावेळी “त्या दिवशी माझ्याकडे पाहून का हसत होता?” असा सवाल करत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढताच आरोपी नितेश पाटील याने संतापाच्या भरात नेताजी पाटील यांच्या मोटरसायकलला लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याने हातातील फायटरने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात नेताजी पाटील यांच्या डोळ्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. यावरही आरोपी थांबला नाही. त्याने लाथाबुक्क्यांनी नेताजी पाटील यांच्या पोटावर, पाठीवर आणि पायांवर मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमी नेताजी पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नितेश पंकज पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), २९६, १२६ (२), ११५ (२), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

Leave a Reply