
नुसते आश्वासन नको, लोकांना प्रत्यक्ष पाणी द्या!”; आमदार अनिल दादा पाटील यांची पालिका अधिकाऱ्यांना तंबी
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि गेल्या २२ दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली वणवण यावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “नुसते आश्वासन नको, तर लोकांना प्रत्यक्ष पाणी द्या,” असे खडेबोल सुनावत त्यांनी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला. दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर आपण स्वतः नगर परिषदेत येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारू, असा इशाराही आमदार अनिल दादा पाटील यांनी दिला.
शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, गेल्या २२ दिवसांपासून अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या प्रश्नासाठी नागरिकांना टँकर, बोअरवेल आणि उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. अनेक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत आमदार अनिल पाटील यांच्याकडे तक्रारी मांडून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार अनिल दादा पाटील यांनी अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणीप्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी उपलब्ध यंत्रणा आणि उपाययोजनांचा प्रभावी वापर करून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दोन दिवसांत प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची मागणी
केवळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन प्रश्न सुटणार नाही. नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार अनिल दादा पाटील यांनी घेतली. संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांत पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश देत त्यांनी प्रशासनाला मुदत दिली. दोन दिवसांत संपूर्ण शहरात नागरिकांना प्रत्यक्ष पाणी मिळाले नाही, तर आपण स्वतः नगर परिषदेत येऊन अधिकाऱ्यांकडून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर आता शहराचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन
आमदार अनिल दादा पाटील यांच्या तंबीनंतर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी वर्गाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निश्चितपणे कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याचे समजते. त्यामुळे गेल्या २२ दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आता दोन दिवसांत प्रत्यक्ष पाणी मिळणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात आणि दोन दिवसांच्या मुदतीत संपूर्ण शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply