
व्हॉल्व्ह बिघाडामुळे ८० हजार लिटर पाणी वाया; साईबाबा नगरात चिखल, नागरिकांत नाराजी
अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड भागातील साईबाबा नगर येथे पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह खराब झाल्याने सुमारे ८० हजार लिटर पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पैलाड भागातील पाण्याच्या टाकीतून पाणी खाली सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मुख्य व्हॉल्व्हमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी तो काढणे आवश्यक होते. मात्र, व्हॉल्व्ह काढण्यापूर्वी टाकीतील सुमारे ८० हजार लिटर पाणी नाईलाजास्तव बाहेर सोडावे लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
या घटनेमुळे परिसरात चिखल साचून नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागला. तसेच, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेकडून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बायपास व्यवस्था करून पुढील भागाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणीमुळे तात्पुरता हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेमुळे पाणी व्यवस्थापन आणि देखभालीबाबत नगरपरिषदेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी कायमस्वरूपी उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
टाकी भरल्यानंतर संबंधित भागाला नियमित पाणीपुरवठा होणार
“तांत्रिक बिघाड झाल्याने टाकीतील पाणी सोडल्याशिवाय पर्याय नव्हता. व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण करून टाकी भरल्यानंतर संबंधित भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल.”
– सत्येम पाटील, अभियंता, अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply