अमळनेर तालुक्यात उष्णतेचा कहर; पाच जणांचा मृत्यू, प्रशासन सतर्क

उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील उष्माघात कक्षाची केली पाहणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या दोन दिवसांत पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन उष्माघात कक्षाची पाहणी केली.याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १२ मे रोजी तीव्र उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १३ मे रोजी बसस्थानक परिसरात बाहदरपूर येथील पुजारी प्रभाकर जोशी यांचाही उष्णतेच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून शीतखोली, कुलर, थंड पाणी, तापमान मापक यंत्रणा, ओआरएस, सलाईन, आइस पॅक तसेच कोल्ड स्पंजिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी २४ तास डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवेत ठेवण्यात आले आहेत.दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री किंवा ओढणीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा

 

“सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाऊ नये. पुरेसे पाणी प्यावे. ताक, निंबूपाणी, नारळ पाणी प्यावे. ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला असून चक्कर येणे, डोकेदुखी, अत्याधिक तहान लागणे, कमी लघवी होणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा.”

-डॉ. प्रकाश किसन ताळे, वैद्यकीय अधिकारी, अमळनेर

 

शक्यतो सकाळीच कामे उरकावीत

 

“सध्या राज्यात व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता जास्त आहे. शक्यतो सकाळीच कामे उरकावीत. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. भरपूर पाणी प्या आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या.”

मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *