एसटीच्या एनसीएमसी कार्डच्या रिचार्जचा प्रश्न ऐरणीवर; ज्येष्ठांसह महिलांना गैरसोयीचा फटका!

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने एसटी प्रवासात महिलांना निम्म्या दरात, तर ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनसीएमसी कार्डची व्यवस्था केली आहे. मात्र, या कार्डच्या रिचार्ज प्रक्रियेमुळे लाखो नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. सवलतीच्या प्रवासासाठी दिलेले कार्ड वापरताना प्रत्येक वेळी बसस्थानकावर जाऊन रिचार्ज करण्याची वेळ येत असल्याने विशेषतः ज्येष्ठ, महिला, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण वाढली आहे.

एनसीएमसी कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना २०० रुपये शुल्क भरावे लागते. तसेच कार्डमधून एसटी प्रवासाचे तिकीट उपलब्ध होण्यासाठी त्यामध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कार्डचा वापर सुरू ठेवण्यासाठी वेळोवेळी त्यामध्ये रक्कम भरावी लागते.bमात्र, रिचार्जची प्रक्रिया सुलभ नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी प्रत्येक वेळी रिचार्ज करण्यासाठी एसटी बसस्थानकावर जाणे त्रासदायक ठरत आहे. बँक किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून थेट एनसीएमसी कार्डमध्ये रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.bशासनाने नागरिकांना सवलतीचा प्रवास उपलब्ध करून दिला असला, तरी त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठीच वारंवार बसस्थानकाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील, तर ही सुविधा खऱ्या अर्थाने ‘सुलभ’ कशी म्हणायची?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एनसीएमसी कार्डसाठी ऑनलाइन रिचार्जची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. रिचार्जसाठी बसस्थानकावर जाण्याची गरज भासणार नसल्याने वेळ आणि श्रमाची बचत होईल.

 

यूपीआय, नेट बँकिंगद्वारे रिचार्जची मागणी

 

एसटी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन एनसीएमसी कार्डसाठी यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा इतर ऑनलाइन माध्यमातून रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांनी केली आहे. सवलतीच्या प्रवासाची सुविधा अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी रिचार्जची ऑनलाइन व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *