
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात २२ जुलैपासून ‘जनसेवा सप्ताह’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण, महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण तसेच “गाव तेथे शाखा, प्रभाग तेथे शाखा” या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार आणि जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर येथील कार्यालयात सकाळी स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या प्रतिमेला आमदार अनिल भाईदास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि आठवणींचा जागर करण्यात आला.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याचे लोकार्पण आमदार अनिल दादा भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संघटन बळकटीसाठी स्व. अजितदादा पवार यांना अनोखी श्रद्धांजली म्हणून अमळनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन आणि फलकांचे अनावरण करण्यात आले. आर. के. नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड, मिलचाळ, तांबेपुरा, गांधलीपुरा, कुंटे रोड, माळीवाडा आणि पैलाड या भागांत शाखा सुरू करण्यात आल्या. आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शेतकरी सहकारी संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
२८ जुलैपर्यंत सुरू राहणाऱ्या ‘जनसेवा सप्ताह’ दरम्यान रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्यविषयक उपक्रम तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व ग्रामीण पदाधिकारी, अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व फ्रंटल सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला अध्यक्षा, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी, अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply