
अमळनेर एसटी आगारात पाच अत्याधुनिक नवीन बसेस सेवेसाठी दाखल
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारात पाच अत्याधुनिक नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बसचे पूजन करून या नव्या बसेस प्रवासी सेवेत दाखल करण्यात आल्या.
अशोक लेलंड कंपनीच्या या बसेस ३ बाय २ आसन रचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसने आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अधिक आरामदायी प्रवासासाठी या बसमध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनिक्षेपक व्यवस्था, बॅक कॅमेरा, एअर सस्पेन्शन तसेच बीएस-६ मानांकनाचे आधुनिक इंजिन अशी अत्याधुनिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. अमळनेर आगारासाठी आणखी पाच नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापूर्वीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे अमळनेर आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या होत्या. नव्याने दाखल झालेल्या बसेसमुळे अमळनेर आगारातील एकूण बससंख्या आता ७५ वर पोहोचली आहे. या उद्घाटन प्रसंगी कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश हिरालाल शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाउंटंट अमोल पाटील तसेच एसटी कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांनी केली नव्या बसमधून प्रवासाची सुरुवात
बसचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसमवेत नव्या बसमध्ये बसून प्रतीकात्मक प्रवास केला. यावेळी उपस्थितांनी नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित व दर्जेदार सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पंढरपूर यात्रेसाठी एसटीला मोठी पसंती
सध्या पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी आषाढी यात्रा सुरू असल्याने एसटी बस सेवेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज अमळनेर आगारातून तीन ते चार बसेस पंढरपूरसाठी धावत आहेत. ग्रामीण भागातील ४० ते ४२ प्रवाशांचा गट उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येत असून या प्रवासात शासनाच्या सर्व सवलती लागू असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश हिरालाल शिवदे यांनी दिली. तसेच यात्रेसाठी अमळनेर आगारातून १२ बसेस इतर आगारांकडेही उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply