
गोविंदा आला रे..! च्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अमळनेर शहरासह तालुक्यात भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला होता. ‘गोविंदा आला रे!’ आणि ‘गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
शहरातील श्रीकृष्ण मंदिरांसह विविध देवस्थानांमध्ये जन्माष्टमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट, विद्युत माळा, रंगीबेरंगी दिवे आणि विविध प्रकारच्या रोषणाईमुळे देवालयांचे रूप अधिकच खुलून दिसत होते. काही ठिकाणी श्रीकृष्णाच्या बालरूपाच्या प्रतिकृती आणि आकर्षक देखावे साकारण्यात आले होते. मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. जन्माष्टमीनिमित्त मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी श्रीकृष्णाच्या बालरूपाला पाळण्यात ठेवून पूजन व आरती करण्यात आली. ‘नंद के घर आनंद भयो, जय कन्हैयालाल की’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. भाविकांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेत जन्मोत्सवाचा आनंद लुटला.
महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. घराघरांत प्रसाद, पाळणा सजावट तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्याची तयारी करण्यात आली होती. अनेक महिला मंदिरांमध्ये एकत्र येऊन भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध ठिकाणी प्रसादाचे वाटपही करण्यात आले..जन्माष्टमीच्या निमित्ताने शहरातील धार्मिक वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिरांची आकर्षक सजावट, भक्तिगीते, भजन-कीर्तन आणि श्रीकृष्ण नामाचा जयघोष यामुळे अमळनेरमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply