नवीन मराठी शाळेत चिमुकल्या गोविंदांनी फोडली दहीहंडी

अमळनेर (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून नवीन मराठी शाळेत दहीहंडी व गोपाळकाला महोत्सव उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकले, ‘गोविंदा आला रे आला’चा जयघोष, पारंपरिक गीतांवरील बहारदार नृत्य आणि दहीहंडी फोडण्याचा रोमांचकारी सोहळा यामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाला होता.

सकाळी ९ वाजता कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला. शाळेच्या मैदानावर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, संचालक राजेंद्र खाडीलकर, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा सुर्वे, शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, केंद्रप्रमुख महेश पाटील, अमळनेर पंचायत समितीचे विशेष शिक्षक प्रशांत पाटील, किशोर पाटील, पंकज काटे, सीमा पाटील आणि मोनाली कापडणे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.

यावेळी शाळेतील चिमुकले विद्यार्थी राधा आणि श्रीकृष्णाच्या मनमोहक वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांच्या निरागस रूपाने उपस्थितांची मने जिंकली. ‘गोविंदा रे गोपाळा’ तसेच ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली.

 

जयघोषाने परिसर दुमदुमला

 

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या दहीहंडी फोडण्याच्या सोहळ्याची विद्यार्थ्यांसह उपस्थितांना उत्सुकता लागली होती. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मानवी मनोरे रचले. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषासह वाद्यांच्या दणदणाटाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. अखेर चिमुकल्या गोविंदांनी उत्साहात दहीहंडी फोडताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले.

यानंतर सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि लाह्यांचा पारंपरिक गोपाळकाला प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. संस्कृती, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम घडवून आणणारा हा दहीहंडी महोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. नवीन मराठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांच्या उत्स्फूर्त सहकार्याने कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *