
तिरंग्यात बाबा निघाले… चिमुकल्याच्या ओठांवर पाण्याचा घोट; हा क्षण पाहून दगडालाही पाझर फुटेल!
बाबा देशासाठी गेले… चिमुकल्याला पाणी पाजताना पाणावले हजारो डोळे!

अमळनेर (प्रतिनिधी ) वीर जवान लान्स नायक रोहित पाटील (काटे) यांच्या अंत्यसंस्कारावेळी मन हेलावून टाकणारा एक क्षण उपस्थितांना अक्षरशः सुन्न करून गेला. वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या गर्दीत वीर जवानाच्या चिमुकल्या मुलाला माजी मंत्र्यांनी आपल्या मांडीवर घेतले, तर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मायेने त्याला पाणी पाजले.
त्या निष्पाप चिमुकल्याला आपल्या भोवती एवढी गर्दी का आहे, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू का आहेत, याची जाणीव तरी कितीशी असणार…? ज्याच्या बाबांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्याच बाबांच्या अंतिम प्रवासात चिमुकल्याला मायेने पाणी पाजतानाचा हा क्षण पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही.
एकीकडे तिरंग्यात लपेटलेल्या वीरपुत्राला अखेरचा सलाम केला जात होता, तर दुसरीकडे वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या चिमुकल्याकडे पाहून प्रत्येकाचे काळीज भरून येत होते.
बाबा पुन्हा मांडीवर घेणार नाहीत… पण त्यांच्या शौर्याची, त्यागाची आणि तिरंग्यासाठी दिलेल्या बलिदानाची सावली या चिमुकल्यासोबत आयुष्यभर राहील.

Leave a Reply