मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’; अमळनेरात शाडू माती गणपती कार्यशाळा

अमळनेर (प्रतिनिधी) : ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’ हा संदेश देत जयनिल फाऊंडेशन, अमळनेरतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे होणार आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून स्वतः गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व प्रशिक्षणार्थीस प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याचे कौशल्य शिकण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही मिळणार आहे. जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम जयश्री अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजश्री राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्तांनी आपल्या मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 

दोन गटांत रंगणार स्पर्धा

 

स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले आहेत. बाल गटात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या गटातील प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. खुल्या गटासाठी वयाची कोणतीही अट नाही. या गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *