
धुरखेडा व शहापूर येथे आगीच्या दोन घटना; सुमारे नऊ लाखांचे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धुरखेडा आणि शहापूर येथे लागलेल्या आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहिली घटना धुरखेडा शिवारात घडली. अनिल पंडित बाविस्कर (रा. अष्टभुजा नगर, जळगाव) यांचे नारणे-धुरखेडा परिसरातील गट क्रमांक ५० मध्ये शेत असून, २५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांच्या शेतातील गोदामाला अचानक आग लागली. या आगीत साडेचार लाख रुपयांच्या ठिबक नळ्या, अडीच लाख रुपयांच्या १३ सोलर प्लेट्स, सुमारे ४० हजार रुपयांचे ८० पीव्हीसी पाईप तसेच इतर साहित्य असे एकूण सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल योगेश बागुल करीत आहेत. दुसरी घटना ३० रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे घडली. गट क्रमांक ४४ मधील कैलास बाबुराव पाटील यांच्या शेतात वादळामुळे विद्युत तारांचा परस्पर संपर्क होऊन शॉर्ट सर्किट झाले. ठिणगी पडून शेतातील काढलेला मका व चारा पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. या आगीत सुमारे ३ एकर क्षेत्रातील ५० ते ६० क्विंटल मका, चारा तसेच ठिबक नळ्या व पीव्हीसी पाईप जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत निंबाच्या झाडांच्या फांद्या व पाण्याचे टँकर वापरून आग आटोक्यात आणली. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. या दोन्ही घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply