पूरग्रस्त साहित्य नदीपात्रात टाकू नका; नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या घरातील धान्य, अन्नपदार्थ, कपडे तसेच विविध घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काही नागरिक भिजलेले धान्य, कुजलेले अन्नपदार्थ व इतर खराब झालेले साहित्य रस्त्यावर, मोकळ्या जागांवर तसेच नदीपात्रात टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून अमळनेर नगरपरिषदेने नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे.

नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, उघड्यावर कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच नदीपात्रात कचरा टाकल्याने जलप्रदूषण होऊन पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. पूर ओसरल्यानंतर शहरातील अनेक घरांमध्ये खराब झालेले धान्य, अन्नपदार्थ, कपडे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता नगरपरिषदेच्या यंत्रणेचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेतर्फे नियमित घंटागाड्यांसोबतच अतिरिक्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पुरामुळे खराब झालेले धान्य, अन्नपदार्थ, कपडे तसेच इतर सर्व प्रकारचा ओला व सुका कचरा केवळ नगरपरिषदेच्या घंटागाडीत किंवा ट्रॅक्टरमध्येच द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर, गटारीत, सार्वजनिक ठिकाणी किंवा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपत्तीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

 

शहर स्वच्छ, सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी

 

आपत्कालीन परिस्थितीत शहराची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, शहर स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त ठेवण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेला नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

 

कचरा घंटागाडी किंवा ट्रॅक्टरमध्येच द्यावा

 

पुरामुळे खराब झालेले धान्य व घरगुती साहित्य रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा नदीपात्रात टाकू नये. यामुळे अस्वच्छता वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. नगरपरिषदेतर्फे घंटागाड्या व अतिरिक्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी कचरा त्यामध्येच द्यावा व शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांने जबाबदारीने सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

गणेश शिंदे,मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *