
भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस ब्रेक देण्याची मागणी
अमळनेर पत्रकार संघासह इतर संघटनेची पोलिस प्रशासनाकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने गडावर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला दोन दिवस पूर्णपणे ब्रेक द्यावा, अशी मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने व शिवसेना शहर प्रमुख भरत पवार सुरेश पाटील सह संकल्प युवा फाऊंडेशन पंकज शेटे यांची महसूल व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
पत्रकार संघटनेने पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गडावरील सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पदयात्रा काढून गडावर जात असतात. अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव आदी तालुक्यांतील भाविक अमळनेर-धुळे मार्गे दिवसा तसेच रात्रीही पायी प्रवास करीत असतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक गडावर जाण्याची शक्यता असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक २६ व २७ मार्च या दोन दिवसांत वाळूच्या अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लहान मुले, महिला व आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने पायी प्रवास करीत असल्याने अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित वाळू वाहतूकदारांना दोन दिवस वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

Leave a Reply