
नरेंद्र पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘ऑरेंज सिटी आयकॉन पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘ऑरेंज सिटी आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. नागपूर येथे दि. २६ जुलै रोजी आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन नरेंद्र पाटील यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक दत्ताभाऊ बारगजे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साने गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून नरेंद्र पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, व्यसनमुक्ती, युवक सक्षमीकरण, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच एचआयव्ही-एड्स जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या समाजाभिमुख आणि सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास विश्व युवा केंद्र, नवी दिल्लीच्या मुक्ता भारद्वाज, महिमा बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या अध्यक्षा शीतल पाटील, नागपूरच्या बबीता ध्रुव, मुंबईचे दयानंद कुबळ, ऑल इंडिया सेल्फ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे संचालक जयंत पाठक तसेच अमरावतीचे बंडू आबटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साने गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना मिळालेला हा पुरस्कार संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, हितचिंतक आणि लाभार्थी यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सन्मानामुळे भविष्यात समाजहिताची विविध कार्ये अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ‘समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या विचाराने प्रेरित होऊन साने गुरुजी फाउंडेशन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.

Leave a Reply