महापुरात सर्वस्व गमावलेल्या फोटोग्राफरला सहकाऱ्यांची आपुलकीची मिळाली साथ

अमळनेर (प्रतिनिधी) शहराला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुराचा मोठा फटका विविध व्यावसायिकांना बसला. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील फोटोग्राफर प्रेम पाटील यांच्या स्टुडिओमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे फोटो व व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. ते पाहून फोटोग्राफर बांधवांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे महाराष्ट्र सचिव पवन बन्सल यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेम पाटील यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. प्रेम पाटील हे संघटनेचे सदस्य नसतानाही केवळ फोटोग्राफर बांधव असल्याच्या भावनेतून ‘एआय पी एच एच ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड’ने मदतीचा हात पुढे केला. संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज, उपाध्यक्ष अशोक कोटियन, महाराष्ट्र खजिनदार नितीन पाटील, महाराष्ट्र सचिव पवन बन्सल आणि दिलीप सोनार यांनी ९ सप्टेंबर रोजी सहकाऱ्यांसह अमळनेर येथे येऊन प्रेम पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांना ३० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी ‘ऑल इंडिया फोटोग्राफर हेल्पिंग हँड फाऊंडेशन’चे संस्थापक व अध्यक्ष धरम सरोज यांनी फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन केले. स्टुडिओमध्ये महत्त्वाची उपकरणे तसेच ग्राहकांचा डेटा असतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात उपकरणे आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. फोटोग्राफी व्यवसायात स्पर्धेपेक्षा एकमेकांना सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. सहकाऱ्याला प्रतिस्पर्धी न मानता मित्र समजून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून गेल्यास व्यवसायाची प्रगती होईल. ‘संकटात मदत हीच खरी एकजूट’ असल्याचे धरम सरोज यांनी सांगितले. अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी असोसिएशनच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांसाठी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. फोटोग्राफर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजेच्या वेळी परस्पर सहकार्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवान पाटील, खजिनदार मनोज चित्ते, अनंत पाटील, नितीन भावसार, गौरव शुक्ल, वरुण पाटील, प्रणव महाजन, राहुल भोई, विपुल पाटील, कुणाल पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते. महापुरात नुकसान झालेल्या सहकाऱ्याच्या मदतीला धावून जात फोटोग्राफर बांधवांनी आपत्तीच्या काळात संघटितपणे उभे राहण्याचा आदर्श घालून दिला. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि संकटसमयी सहकार्याचा हात देणे, हाच खऱ्या अर्थाने जागतिक छायाचित्रण दिनाचा संदेश असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *