
ढेकू बुद्रुक येथे दोन अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता; अज्ञातांकडून पळवून नेल्याचा संशय, गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथे एकाच दिवशी दोन कुटुंबातील साडे सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना २६ रोजी उघडकीस आली. अज्ञात व्यक्तींनी फूस लावून त्यांना पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक इसम व त्याचा भाचा हे समोरासमोर राहतात. २६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता दोन्ही कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे शेती कामासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी दोन्ही घरांमध्ये साडे सोळा वर्षांच्या मुली एकट्याच होत्या. सायंकाळी सुमारे ६ वाजता कुटुंबीय घरी परतल्यानंतर दोन्ही मुली घरात नसल्याचे लक्षात आले. सुरुवातीला नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; मात्र दोन ते तीन दिवस शोधूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय बळावला.
यानंतर पालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत असून, मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध स्तरांवर तपास करत आहेत.

Leave a Reply