अमळनेरात जाणवतोय उष्णतेचा तडाखा; उष्माघात व डायरीयाचे रुग्ण संख्येत झाली वाढ

अमळनेर (प्रतिनिधी )  राज्यभर वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात उष्णतेचा प्रभाव तीव्र होत असून उष्माघाताच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक शासकीय रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये लहान मुलांमध्ये डायरीयाचे प्रमाण वाढले असून विषाणूजन्य ताप, मळमळ, जुलाब, पोटदुखी आदी तक्रारींनी दररोज ८ ते १० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ व अशक्तपणा अशा तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

उष्माघाताची प्रमुख लक्षणे

 

उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रण बिघडून शरीरावर गंभीर परिणाम होणे म्हणजे उष्माघात होय. चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, जास्त घाम येणे किंवा अचानक घाम थांबणे, ताप वाढणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत.

 

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

 

डॉक्टरांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ जसे लिंबूपाणी, चिंच पन्हे, ओआरएस घ्यावे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल १वापरावा, हलके व सैल कपडे परिधान करावेत तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे उष्माघात कक्ष तातडीने सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत

 

“सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.”

डॉ. जी. एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर. 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *