अमळनेर येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव भक्तीमय वातावरणात केला साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील श्री राम मंदिर येथे २६ मार्च रोजी श्री राम नवमी निमित्त पारंपरिक व भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. श्रीमंत प्रताप शेठ अग्रवाल यांच्या परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तन कार्यक्रमामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत आली.

मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून श्रीरामांचे दर्शन घेतले. दि. २४ व २५ मार्च रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत आयोजित कीर्तन कार्यक्रमात राजीव कृष्णाजी झा महाराज यांनी आपल्या अमृतमय वाणीतून श्रीराम कथा सादर केली. या कीर्तनाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. दि. २६ मार्च रोजी सकाळी ९.१५ वाजता श्रीराम जन्मोत्सव कथा पार पडली, तर दुपारी बरोबर १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी “जय श्रीराम” च्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. उत्सवानिमित्त भाविकांना प्रसाद व थंड पेयांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमंत प्रताप शेठजी यांचे पणतू चि. मिलिंद महेश अग्रवाल, मयंक महेश अग्रवाल व अग्रवाल परिवारातील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच निस्वार्थ सेवेकरी जितेंद्र चौधरी, पुजारी सारंग कुळकर्णी, मंदिर कर्मचारी महेंद्र परदेशी, गणेश चौधरी, सत्यवान महाजन आदींनी मोलाचे सहकार्य केले.

 

सन १९४२ मध्ये मंदिराची स्थापना

 

अमळनेर येथील श्रीराम मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून या मंदिराची स्थापना सन १९४२ मध्ये करण्यात आली आहे. मंदिरात आदि शंकराचार्य यांची प्राचीन मूर्ती स्थापित असून पाच मजली वास्तुशिल्पामुळे हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.

दानशूर उद्योगपती श्रीमंत प्रताप शेठ अग्रवाल यांनी अमळनेर शहराच्या विकासात मोठा वाटा उचलला असून शिक्षण, तत्त्वज्ञान व समाजसेवेत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या प्रेरणेने मंदिर व परिसराचा विकास होत असून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

विकासासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे

 

दरम्यान, श्रीराम भक्तांच्या वतीने मंदिराच्या पुढील विकासासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वेच्छेने सेवा किंवा मदतीसाठी श्री राम मंदिर ट्रस्टी मिलिंद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *