
रामनवमी आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरमध्ये पाणपोई सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम नवमी तसेच जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आजी-माजी सैनिकांच्या खान्देशी रक्षक फाउंडेशनच्या वतीने अमळनेर शहरात पाणपोई उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
या पाणपोईचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नागरिकांना शुद्ध व थंड जारचे पाणी सुरक्षा रक्षकाच्या देखरेखीखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पाणपोईचा लाभ ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेतकरी बांधव तसेच गोरगरीब व गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पाणपोईचे उद्घाटन अमळनेर नगरपालिकेचे नगरसेवक व माजी सैनिक सचिन बळवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रताप आबा छबुलाल साळी, नगरसेवक चंदूसिंह नाना परदेशी यांच्यासह खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी, शहराध्यक्ष धनराज पाटील, माजी सैनिक शिवदास शेटे, रामकृष्ण पाटील, जयदीप राजपूत, प्रवीण पाटील, अंकुश पाटील, रोकडे सर, प्रकाश परदेशी, अकील शेख आदींसह असंख्य आजी-माजी सैनिक उपस्थित होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या पाणपोई उपक्रमामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळत असून या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply