
प्रताप महाविद्यालयात १६ व १७ सप्टेंबरला रंगणार राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा
अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सीसीएमसी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.
या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेसाठी साहित्य व कला, भारताचा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान व आरोग्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, भारतीय अर्थव्यवस्था, क्रीडा, पर्यावरण, राज्यव्यवस्था व शासन, वाणिज्य, माहितीचा अधिकार, विज्ञान व तंत्रज्ञान, मानव संसाधन विकास व मानवी हक्क, चालू घडामोडी, कृषी, पूज्य साने गुरुजी तसेच अन्य समाजसुधारक अशा विविध ज्ञानशाखांचा व्यापक अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासोबतच विविध विषयांवरील आकलन, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि तत्परतेची कसोटी लागणार आहे. स्पर्धेच्या तीन फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. दुसऱ्या फेरीत ध्वनी-चित्रफितीवरील प्रश्नांची घंटा फेरी होईल. तर तिसऱ्या व अंतिम फेरीत पूज्य साने गुरुजी आणि अन्य समाजसुधारकांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील या स्पर्धेचे समन्वयक डॉ. किरण गावित, तर सह-समन्वयक प्रा. भाग्यश्री जाधव आहेत. पूज्य साने गुरुजी यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये व्यापक वाचनाची सवय, सामाजिक भान आणि विविध विषयांचे ज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संचालक मंडळाने स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, सीसीएमसी विभागाचे माजी समन्वयक डॉ. विजय तुंटे, सध्याचे समन्वयक डॉ. धनंजय चौधरी आणि सह-समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनीही स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे सदस्य तन्मयतेने तयारी करीत आहेत.
विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला ७ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकासाठी २ हजार रुपये व चषक, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी १ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Leave a Reply