अमळनेरच्या २७७३ पूरग्रस्त मालमत्तांना अखेर दिलासा; ३ कोटी ७ लाख ६४ हजारांचे अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा

अमळनेर (प्रतिनिधी) : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यात तब्बल २७७३ मालमत्तांचे नुकसान झाले होते. शासनाने पूरग्रस्तांसाठी अनुदान जाहीर केले असले तरी तहसीलदारपद रिक्त असल्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया रखडली होती. आता उमा ढेकळे यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याने पूरग्रस्तांच्या खात्यावर सुमारे ३ कोटी ७ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहरातील २०२६ घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहरातील १८ घरांची पडझड झाली, तर १३३ दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. ग्रामीण भागात ३६३ घरांची पडझड झाली असून २३३ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीची पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार अनिल दादा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी मयुर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त पाहणी केली होती. शासनाच्या निकषानुसार घरात पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान झाल्यास १० हजार रुपये, घराची पडझड झाल्यास ४ हजार रुपये आणि दुकानात पाणी शिरून नुकसान झाल्यास ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

मात्र, पाहणीनंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा निलंबित झाले. त्यांच्या जागी ज्योती वसावे यांच्याकडे तहसीलदारपदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्या दिव्यांग असल्याने क्षेत्रीय पाहणी तसेच इतर कामांसाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महसूल व वनविभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्याकडे पदभार देण्याचे निर्देश दिले होते. अप्पर आयुक्तांनीही यासंदर्भात पत्र दिल्यानंतर १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उमा ढेकळे यांच्याकडे तहसीलदारपदाचा पदभार सोपविला. दरम्यान, वजा शिल्लक असली तरी पूरग्रस्तांना अनुदान देता येईल, असे शासनाचे आदेश प्राप्त झाले होते. मात्र तहसीलदारांच्या खात्यावरून रक्कम वर्ग करण्यासाठी अमळनेरला पूर्णवेळ तहसीलदार उपलब्ध नसल्याने अनुदान वितरणाची प्रक्रिया रखडली होती. याबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे भूषण भदाणे यांनीही पूरग्रस्तांना तातडीने अनुदान देण्याची मागणी केली होती. आता उमा ढेकळे यांनी तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारल्याने पूरग्रस्तांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यातील प्रशासकीय अडचण दूर झाली आहे. त्यामुळे महिनाभरापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *