
गोकुळधाम सोसायटीतील गटारीची समस्या अखेर सुटली, नागरिकांना दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रताप नगर, गलवाडे रोड येथील गोकुळधाम सोसायटी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गटारीच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला असून भुयारी गटाराचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात सतत पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पायी चालणारे नागरिक, शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत होता. साचलेल्या पाण्यामुळे वाहनांमधून पाणी उडून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. या गंभीर समस्येकडे पत्रकार नूरखान यांनी वेळोवेळी लक्ष वेधत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केली. अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी प्रकरणाची गंभीरता ओळखून बांधकाम विभागाला तात्काळ आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाने जलद गतीने काम हाती घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भुयारी गटाराचे बांधकाम पूर्ण केले. सदर काम पूर्ण झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या निकाली निघाली असून आता रस्त्यावर पाणी साचत नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने वाहतूकही सुरळीत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले असून या कामामुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाल्याचे नागरिकांनी सांगितले. एकूणच प्रशासन आणि पत्रकार नूरखान यांच्या प्रयत्नांमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही समस्या मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply