
निंभोरा जिल्हा परिषद शाळेची युक्ता राहुल पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात आली अकरावी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी युक्ता राहुल पाटील हिने इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अमळनेर तालुक्याच्या गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकावला आहे. तिने परीक्षेत १९२ गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली असून तिच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युक्ता राहुल पाटील हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले. तिच्या यशामुळे निंभोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही तिने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या यशामागे शाळेचे उपशिक्षक दिनेश अहिरे आणि मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थिनीला नियमित सराव, अभ्यासाचे नियोजन आणि आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन दिले. त्याचबरोबर पालकांनीही तिला सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. युक्ता राहुल पाटील ही साने गुरुजी शाळेचे उपशिक्षक राहुल पाटील आणि निंभोरा जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका मोहिनी पाटील यांची सुकन्या आहे. शिक्षकी परंपरेत वाढलेल्या युक्ताने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तालुक्यात विशेष स्थान मिळवले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply