
अवैध मुरूम वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; पाच लाखांच्या डंपरसह मुद्देमाल जप्त
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अवैध मुरूम व वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाया सुरू ठेवल्या असून अमळनेर–पिंपळे रस्त्यावर अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत डंपरसह चार ब्रास मुरूम असा एकूण पाच लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डंपर मालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, महेंद्र सुतार आणि अनिल बोरसे यांनी संयुक्त कारवाई केली. अमळनेर–पिंपळे रस्त्यावर एमएच ०१ सीआर ६४७५ क्रमांकाचा डंपर चार ब्रास मुरूमाची अवैधरित्या वाहतूक करताना पथकाला आढळून आला. चौकशीदरम्यान डंपरचे मालक भगीरथ वसंत पाटील (रा. ढेकू रोड, अमळनेर) यांच्याकडे गौण खनिज वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने पाच लाख रुपये किमतीचा डंपर आणि सोळा हजार रुपये किमतीचा चार ब्रास मुरूम असा एकूण पाच लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला डंपर तहसील कार्यालयाच्या ताब्यात ठेवण्यात आला असून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी आदिती जरे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भगीरथ वसंत पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत असून, वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply