
आरी वर्क प्रशिक्षणातून महिलांच्या आत्मनिर्भरतेला बळ : जयश्री अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) महिलांनी केवळ कौशल्य आत्मसात करून थांबू नये, तर त्या कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे. अशा प्रकारच्या कौशल्याधारित प्रशिक्षणांमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळून स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचा विश्वास जयश्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामिनी प्रकल्पांतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोळा दिवसीय ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. महिलांना ब्लाऊज, ड्रेस तसेच विविध वस्त्रांवर आकर्षक आरी वर्कची कला आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणामध्ये एकूण ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना बेसिकपासून ॲडव्हान्स स्तरापर्यंत विविध प्रकारचे आरी वर्क, आधुनिक डिझाइन्स, फिनिशिंग आणि व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे महिलांच्या कौशल्यात वाढ होऊन त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जयश्री अनिल पाटील, कांचन शहा, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच कार्यकारी संचालक रेणू प्रसाद उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भारती पाटील यांनी महिलांनी कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. महिलांच्या हाताला कौशल्य आणि उद्योगाची जोड मिळाल्यास त्या स्वतःबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
जयश्री अनिल पाटील यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत शिकलेल्या कलेचे व्यवसायात रूपांतर करण्याचे आवाहन केले. अशा प्रशिक्षणांमुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना अधिक दृढ होत असून ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षिका नयना राजपूत यांनी सहभागी महिलांना बेसिक ते ॲडव्हान्स आरी वर्कचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांनी महिलांनी तयार केलेल्या आरी वर्कच्या विविध नमुन्यांची पाहणी करून त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुरलीधर बिरारी, उर्जिता शिसोदे तसेच संस्थेचे कार्यकर्ते भावेश मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी भविष्यात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply