डिझेल टंचाईने अमळनेरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प; ट्रक मालकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

पंपांवर तासन्‌तास रांगा, शेतमाल वाहतुकीवर परिणाम; रेती डंपरांना मात्र डिझेल सहज मिळत असल्याचा आरोप

 

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे अमळनेरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अक्षरशः विस्कळीत झाला असून ट्रक मालक, चालक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “पंपावर दिवसन्‌दिवस रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नाही, मात्र काही वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू आहे,” असा आरोप करत अमळनेर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

अमळनेर शहरातील विप्रो साबण कारखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जाते. तसेच बाजार समितीतून मका, ज्वारी, बाजरीसह विविध कृषी मालाने भरलेल्या ट्रकची मोठ्या प्रमाणावर आवक-जावक असते. मात्र डिझेलअभावी अनेक ट्रक उभे राहत असल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत असून व्यापारी, शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचा आरोप ट्रक मालकांनी केला आहे.

ट्रक चालकांच्या म्हणण्यानुसार, डिझेल पंपांवर इंधन येण्यापूर्वीच लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकदा तासन्‌तास प्रतीक्षा करूनही नंबर येण्यापूर्वीच डिझेल संपत असल्याने चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काहींना तर एक-दोन दिवस गाड्या थांबवून ठेवाव्या लागत असल्याचा दावा करण्यात आला. “रोजीरोटी चालवायची की पंपावर रात्र काढायची?” असा संतप्त सवाल चालकांनी उपस्थित केला.

दरम्यान, ट्रक मालकांनी गंभीर आरोप करत म्हटले की, सामान्य ट्रक आणि शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रांगेत उभे राहावे लागत असताना रेती वाहतूक करणारे डंपर मात्र क्वचितच रांगेत दिसतात, तरी त्यांची वाहतूक नियमित सुरू असते. त्यामुळे डिझेल वितरणात दुहेरी निकष लावले जात आहेत का, अशी चर्चा ट्रान्सपोर्ट क्षेत्रात रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. “वेळेत डिझेल उपलब्ध करून द्या, अन्यथा ट्रान्सपोर्ट क्षेत्राला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा निवेदनातून देण्यात आल्याचे समजते.

यावेळी गोविंदभाई दलाल, बिस्मिल्ला खान पठाण, जगन्नाथ वामनराव पाटील, रुकनुद्दीन पठाण, शांताराम काशिनाथ सातपुते, इकबाल इब्राहिम पठाण यांच्यासह अनेक ट्रक मालक व चालक उपस्थित होते. आता प्रशासन या वाढत्या संतापाची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *