
अमळनेर तालुक्यातील वावडे येथे तरुण शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील एका २७ वर्षीय तरुण शेतमजुराने शेतात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना १९ मार्च रोजी दुपारी घडली. नितीन युवराज भिल असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वावडे येथील रहिवासी नितीन युवराज भिल (वय २७) हा तरुण १९ मार्च रोजी नेहमीप्रमाणे प्रवीण आत्माराम पाटील यांच्या शेतात मजुरीच्या कामासाठी गेला होता. दुपारी काम करत असताना त्याने अचानक विष प्राशन केले. विषबाधा झाल्यामुळे त्रास होऊ लागताच नितीनने आपला मित्र दादा पिरन भिल याला फोन करून स्वतः विष घेतल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नितीनचे वडील युवराज भिल आणि त्याच्या भावाने तातडीने शेतात धाव घेतली. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉ. हर्षदा बागुल आणि डॉ. वसावे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत नितीनच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Leave a Reply