
दुधाचा फॅट वाढवण्यासाठी भेसळयुक्त दूध निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; आरोपी अटक
अमळनेर (प्रतिनिधी) : दुधाचा फॅट वाढवण्यासाठी भेसळयुक्त दूध तयार करून ते गायीच्या दुधात मिसळून विक्रीसाठी पाठविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. जानवे-इंदपिंप्री रस्त्यावरील एका पत्री शेडमध्ये सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी महेश दिलीप पाटील (वय २७) याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना जानवे येथे भेसळयुक्त दूध तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ३० ऑगस्ट रोजी जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे यांना माहिती देऊन कारवाईसाठी पाचारण केले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे आणि त्यांचे सहकारी ऋषभ चव्हाण, तसेच अमळनेर पोलिसांचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, सुनील तेली, विनोद संदानशीव, नितीन मनोरे, निलेश मोरे आणि सागर साळुंखे हे जानवे येथे पोहोचले. जानवे-इंदपिंप्री रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजता एका पत्री शेडवर पथकाने छापा टाकला. त्यावेळी महेश दिलीप पाटील हा मिक्सरच्या साहाय्याने भेसळयुक्त दूध तयार करताना आढळून आला. चौकशीत त्याने दहा लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते शंभर लिटर गायीच्या दुधात फॅट वाढवण्यासाठी मिसळत असल्याची माहिती पोलिसांना दिली. हे दूध पुढे धुळे येथे विक्रीसाठी पाठविले जात असल्याचेही त्याने सांगितले. कारवाईदरम्यान पोलिसांनी मिक्सर, सोयाबीन तेल, लोखंडी कॅन, गायीचे दूध आणि इतर साहित्य जप्त केले. अन्न व औषध प्रशासन अधिकारी आकाश बोराडे यांच्या फिर्यादीवरून महेश दिलीप पाटील याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(१), २७(३), ३१(१), ३१(२), ५९ तसेच भारतीय न्यायसंहितेतील कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी महेश दिलीप पाटील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Leave a Reply