
माहेरचा पारिजात’मध्ये अमळनेरच्या लेकींनी अनुभवली पक्ष्यांची अनोखी दुनिया!
अमळनेर (प्रतिनिधी) माहेरच्या अंगणातील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांना आपल्या कर्तृत्वाने व मायेने समृद्ध करणाऱ्या अमळनेरच्या लेकींचा स्नेहमेळा ‘माहेरचा पारिजात’ या उपक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे आयोजित या स्नेहमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी माहेरवाशिणींनी निसर्ग, अध्यात्म, पारंपरिक खेळ, गप्पागोष्टी, हास्य-विनोद, विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.
शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली. दिवसभरातील विविध कार्यक्रमांनंतर श्री मंगळग्रह मंदिरात सर्व माहेरवाशिणींनी विविध खेळ, नृत्य आणि गप्पागोष्टींमध्ये सहभागी होत रात्र आनंदात जागवली. या उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. रविवारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्व महिला उठल्या. त्यानंतर अतिशय रम्य, शांत, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प. पू. संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेत फेरफटका मारण्यासाठी गेल्या. या रोपवाटिकेत पक्ष्यांसाठी बाराही महिने पिण्याचे पाणी आणि खाद्यधान्याची व्यवस्था केली जाते. मंदिर परिसरातील झाडांवर पक्ष्यांना अंडी देण्यासाठी, ती उबविण्यासाठी तसेच नवजात पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे शंभर मडकी बांधण्यात आली आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी मंगळग्रह मंदिर परिसर आश्रयस्थान ठरला आहे. रोपवाटिकेत फेरफटका मारताना महिलांना विविध प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले. पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज ऐकून उपस्थित माहेरवाशिणींना मनस्वी आनंद झाला. निसर्गाच्या सान्निध्यातील ही सकाळची सफर त्यांच्यासाठी जणू सुमधुर आणि सुगंधी ‘सुप्रभात सफर’ ठरली. यावेळी काही महिलांनी दैनंदिन व्यायाम तसेच योगसाधनाही केली. यानंतर स्नान करून सकाळी सात वाजता सर्वांनी श्री मंगळग्रह देवांची सामूहिक आरती केली. सकाळी साडेआठ ते साडेनऊदरम्यान अल्पोपहार घेतल्यानंतर अमळनेर डेपोच्या बसने सर्व माहेरवाशिणींनी नीम येथे प्रस्थान केले. सकाळी साडेदहा वाजता नीम येथील तापी, पांझरा आणि लुप्त गंगा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात त्या पोहोचल्या. तेथे सर्वांनी श्रद्धापूर्वक कपिलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. काही माहेरवाशिणींनी अभंग आणि भजने सादर करून आध्यात्मिक सेवाही कपिलेश्वर महादेवांच्या चरणी अर्पण केली.
दुपारच्या भोजनानंतर जवळपास अर्धा तास गप्पागोष्टी, हास्य-विनोदात रमल्यानंतर सर्वांनी पुन्हा बसने श्री मंगळग्रह मंदिर गाठले. दुपारी चार वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पारंपरिक सागर गोटे, काचा-कवड्या, चौपट, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो, लगोरी, बेसबॉल, आंधळी कोशिंबीर आणि संगीत खुर्ची अशा विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर सर्वांनी श्री मंगळग्रहाची सामूहिक सायंआरती केली. सायंकाळी साडेसात वाजता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. यातील मिमिक्रीने उपस्थितांची मनमुराद करमणूक केली. रात्रीच्या भोजनानंतर शेकोटीभोवती नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम रंगला. रात्री उशिरापर्यंत महिलांनी नृत्य, गायन आणि स्नेहाच्या वातावरणात या मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला. या वेळी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा कांचनताई शहा, उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सरोजताई भांडारकर, सचिव वसुंधराताई लांडगे आणि कोशाध्यक्षा प्रा. शीलाताई पाटील यांच्यासह कार्यकारी मंडळातील सदस्या उपस्थित होत्या.
आज ‘माहेरचा पारिजात’चा समारोप
‘माहेरचा पारिजात’ स्नेहमेळ्याचा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. सकाळी ८.३० वाजता नाश्ता, तर सकाळी ९.३० वाजता माहेरवाशिणींचे ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर स्नेहमेळ्याचा समारोप होईल.

Leave a Reply