मातीतून साकारला गणपती; ‘मूर्तीकार व्हा’ कार्यशाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुर्तीकार व्हा’ कार्यशाळेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मातीसोबत खेळत गणपतीची मूर्ती साकारण्याचा आणि निर्मितीचा आनंद अनुभवला. या कार्यशाळेत डॉ. लिना चौधरी यांनी सहभागीांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतानाच श्रद्धा, कृतज्ञता आणि जिव्हाळा या मूल्यांचा अर्थही उलगडून सांगितला.

गणपती बाप्पाची मूर्ती साकारताना केवळ कलाकृती निर्माण करणे हा उद्देश नसून त्यातून पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजविणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. लिना चौधरी यांनी सांगितले. गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक सजावट करावी आणि पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन केले तरच बाप्पा खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील, असा संदेश त्यांनी दिला. श्रद्धेच्या नावाखाली इतरांना त्रास होणार नाही, याचीही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपल्या श्रद्धेमुळे कोणालाही ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असेल तर ते टाळले पाहिजे. गणपती बाप्पा भेदभाव विसरून माणसाने माणसाशी एकोप्याने राहण्याचा संदेश देतात. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही डॉ. लिना चौधरी यांनी केले. घरातील कुंडीमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करून त्याच मातीत सुगंधी फुलांचे रोप लावण्याचा सुंदर संदेशही कार्यशाळेत देण्यात आला. या रोपातून दरवळणारा निर्मळ सुगंध आपल्या कामात आणि चारित्र्यातही दरवळत राहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यशाळेदरम्यान **‘गणपती बाप्पा मोरया’**चा जयघोष करत लहान बालकांनी मातीत मनसोक्त खेळत मूर्ती निर्मितीचा आनंद घेतला. स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती साकारण्याचा अनुभव बालकांसाठी विशेष आनंददायी ठरला. मातीशी नाते जोडताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पनाही त्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अजय भिल, चेतन भोई, कल्पेश वाणी, दर्शना पवार, डॉ. अतुल चौधरी, गोपाळ नेवे, तुषार पाटील, शुभम पवार, राहुल पाटील, साक्षी सोनार, उमेश सोनार, डॉ. सचिन पाटील, डॉ. मिलिंद वैद्य, सतीश देशमुख, सचिन पाखले आणि मिनोती जगताप यांनी प्रयत्न केले. कार्यशाळेच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहभागी सर्वांना शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले. पर्यावरण, संस्कार आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम घडविणारी ही कार्यशाळा गणेशोत्सवाकडे पाहण्याची पर्यावरणपूरक दृष्टी देणारी ठरली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *