
विप्रो कंपनीजवळून तरुणीला पळविले; पातोंडा येथील तरुणी व तिची २२ वर्षीय मावशीही बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून, शहरातील विप्रो कंपनीजवळून १९ वर्षीय तरुणीला पळवून नेण्यात आले, तर पातोंडा येथील २३ वर्षीय तरुणी आणि तिची २२ वर्षीय मावशी बेपत्ता झाल्या आहेत. या दोन्ही घटनांप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील पाठक गल्लीतील १९ वर्षीय तरुणी विप्रो कंपनीत कामाला होती. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एकाने तिला कंपनीजवळून पळवून नेले. तरुणी घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना तालुक्यातील पातोंडा येथे घडली. येथील २३ वर्षीय तरुणी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुकानावरून सामान घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली; मात्र ती परत आली नाही. त्याच दिवशी तिच्या शेजारी राहणारी २२ वर्षीय मावशीही आई आणि भाऊ घरी नसताना घरातून बेपत्ता झाली. सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलीच्या मामाला भाची आणि बहीण घरी दिसल्या नाहीत. त्यांचा शोध घेतला असता गावातील दोन तरुणांनी त्यांना पळवून नेल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Leave a Reply