
साधेपणाचा आदर्श जपत मंगळग्रह मंदिरात २४ रोजी तुळशी विवाह सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) श्री मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.१५ वाजता मंगलाष्टके, तर सायंकाळी ७.१५ वाजता तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विवाह सोहळ्यांमध्ये होणारी पैशांची उधळपट्टी टाळून विवाह विधिवत आणि साधेपणाने करण्याचा सामाजिक संदेश मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दिला जात आहे. या समाजाभिमुख उपक्रमाचा प्रारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. त्याअंतर्गत विवाह सोहळे अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने करण्याची शपथ दिली जाते. याच विचारातून मंदिरातील तुळशी विवाह सोहळाही गेल्या काही वर्षांपासून कोणताही भपका न करता पारंपरिक हिंदू संस्कृतीनुसार आणि पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जात आहे. भव्य सजावट किंवा स्नेहभोजनावर संस्थेतर्फे कोणताही खर्च केला जात नाही. भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांचा परमपवित्र विवाह सोहळा साधेपणातून सामाजिक आदर्श जपणारा ठरणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply