
अमळनेर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीसह संशयित तरुण ताब्यात; जीआरपी-आरपीएफची सतर्क कारवाई
लग्नाचे आमिष दाखवून पळविल्याचा आरोप; उत्तर प्रदेश पोलिसांकडे गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणासह अल्पवयीन मुलीला जीआरपी व आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी घडली. चौकशीत संबंधित तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची बाब समोर आली असून याप्रकरणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमळनेर रेल्वे स्थानकावर जीआरपी व आरपीएफचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक तरुण व त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बसलेली आढळली. पोलिसांना संशय आल्याने दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर लोहमार्ग पोलीस चौकी येथे चौकशीसाठी आणण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर मुलीकडून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्यात आला. यावेळी संबंधित तरुणाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. तसेच या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही सांगितले.
मुलीचे पालक व संबंधित पोलीस अमळनेर येथे पोहोचेपर्यंत दोघांना ताब्यात ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात रवाना केले. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या व संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजराम कुमार गुप्ता (वय २२) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून सध्या गुजरात येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत अमळनेर रेल्वे पोलीस चौकीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शिजवळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर विसावे, पोलीस हवालदार नरेंद्र लोंढे, घोराडे तसेच आरपीएफचे एएसआय कुलभूषण सिंग व हेड कॉन्स्टेबल नंदू पाटील यांनी केली.

Leave a Reply