टँकर हळू चालवण्यास सांगितल्याचा राग; चौघांकडून दोघा भावांना लोखंडी पट्टीने मारहाण

सडावणजवळील घटनेत दोघे जखमी; चौघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

 

अमळनेर (प्रतिनिधी) टँकर हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी दोघा भावांना बेदम मारहाण करत लोखंडी पट्टीने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना ८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर-पारोळा रस्त्यावर सडावण गावाजवळील नायरा पेट्रोल पंप परिसरात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, युवराज शंकर मोरे (रा. शांताबाई नगर, अमळनेर) हे आयशर वाहनाने शिरसमणी (ता. पारोळा) येथे जात होते. यावेळी आयशर वाहन चालवत असलेले चालक सुदाम पाटील यांच्या समोर अचानक रस्त्यावर पाणी मारणारे टँकर येऊन उभे राहिल्याने त्यांनी तातडीने जोरात ब्रेक मारला. अचानक ब्रेक लागल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारानंतर युवराज मोरे यांनी टँकर चालकाला वाहन हळू चालवण्यास सांगितले. मात्र, याचाच राग आल्याने टँकर चालकासह मुकेश संजय ठाकरे, संजय रुपचंद ठाकरे व अमोल नाना पाटील (सर्व रा. खोकरपाट, ता. अमळनेर) यांनी युवराज मोरे व त्यांचे भाऊ सुरेश मोरे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी काठीला लावलेल्या लोखंडी पट्टीने दोघांच्या डोक्यात वार केल्याने ते जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जखमी युवराज मोरे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *