
मजुरीचे पैसे मागितल्याने मिस्तरीवर घरात घुसून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) बांधकामाचे थकित पैसे मागण्यासाठी गेलेल्या मिस्तरीवर संताप व्यक्त करत दोघांनी त्याच्या घरी जाऊन मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कांतीलाल शालीक पाटील (रा. टाकरखेडा) यांनी आपल्या घराचे बांधकाम भिकन सुलतान पिंजारी याच्याकडे दिले होते. काम पूर्ण झाल्यानंतरही ठरलेले पैसे न मिळाल्याने भिकन पिंजारी हा मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेला होता. याचा राग मनात धरून कांतीलाल पाटील व त्याचा शालक यांनी भिकन पिंजारीच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली तसेच शिवीगाळ करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर भिकन पिंजारी यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ (१)(२), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी योगेश बागुल करीत आहेत. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply