
अमळनेरात आज भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) गोदावरी मेडिकल फाऊंडेशन, जिजाऊ बहुउद्देशीय संस्था (अमळनेर) आणि फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २६ जुलै रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना विविध आजारांवरील तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि महागड्या तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या आरोग्य शिबिरात हृदयरोग, कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मानसोपचार, कान-नाक-घसा विकार, मूत्रपिंडाचे आजार आदी विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक उपचारांबाबत सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय ३डी-इको, ईसीजी, मधुमेह तपासणी आणि रक्तदाब तपासणी यांसारख्या खर्चिक वैद्यकीय चाचण्याही नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहेत. तसेच एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, पेसमेकर बसविणे आणि इतर उपचारांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळू शकणाऱ्या पात्र रुग्णांची निवडही या शिबिरात केली जाणार आहे.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक रुग्णांनी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा अन्य वैध मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांहून शिबिरस्थळी ये-जा करण्यासाठी मोफत बस सेवेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ बहुउद्देशीय संस्था आणि फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply