
श्री मंगळग्रह मंदिरात देशातील पहिली व्हीआर दिव्यदर्शन सेवा सुरू
एआय तंत्रज्ञानानंतर आता आभासी दर्शनाची सुविधा; भाविकांना घरबसल्या मिळणार डिजिटल अनुभव
अमळनेर (प्रतिनिधी) येथील यांच्या वतीने श्री मंगळग्रह मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारा अत्याधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. बुधवार, दि. ६ मे रोजी आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. देशात प्रथमच अशा प्रकारची व्हीआर आधारित सेवा श्री मंगळग्रह मंदिरात कार्यान्वित करण्यात आल्याने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ यंत्रणा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे श्री मंगळग्रह मंदिर हे देशातील पहिले एआय तंत्रज्ञानाधारित मंदिर ठरले आहे. आता व्हीआर सुविधेमुळे जगभरातील भाविक आणि पर्यटकांना मंदिराचा डिजिटल अनुभव घरबसल्या घेता येणार असून धार्मिक पर्यटनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे, कामगार नेते एल. टी. नाना पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, आशाताई महाले, ‘ग्लोबल महातेज’चे कार्यकारी संपादक भरत पाटील, ब्युरो चीफ रजनीकांत पाटील, आर्टिस्ट समीर सांगळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व सेवेकरी उपस्थित होते. या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांना श्री मंगळग्रह मंदिर परिसराचा संपूर्ण आभासी फेरफटका मारता येणार आहे. मंदिरातील विविध देवतांची स्थाने, गाभारा, पूजाविधींची ठिकाणे आणि परिसर ३६० अंशांमध्ये पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या परस्परसंवादी स्पर्शपटल केंद्राद्वारे तसेच मोबाईल किंवा संगणकावर कोणतेही ॲप डाउनलोड न करता ही सेवा वापरता येणार आहे. मोबाईल लिंकद्वारे या सुविधेचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या डिजिटल भ्रमंतीमध्ये मार्गदर्शित आणि स्वयंचलित असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ध्वनी मार्गदर्शनाची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना प्रवासाचे नियोजन सुलभ होणार आहे. वृद्ध भाविक, दिव्यांग नागरिक तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
याचबरोबर मंदिरात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी, वाहन व्यवस्थापन आणि नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यासाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प इम्पॅक्ट सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या तंत्रज्ञान कंपनीने विकसित केला आहे. मुंबई, कोची आणि दिल्ली येथे कार्यालये असलेल्या या कंपनीने डिजिटल ट्विन तंत्रज्ञान, जीआयएस नकाशांकन, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण, नगररचना आणि अनुभवात्मक पर्यटन उपाययोजनांच्या सहाय्याने मंदिराची सविस्तर डिजिटल प्रतिकृती तयार केली आहे. ड्रोन फोटोग्रॅमेट्री, ३६० अंशीय स्कॅनर आणि प्रगत त्रिमितीय रेंडरिंग तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात करण्यात आला आहे. या कार्यसंघात चेन्नईचे मिथुन आनंद, मुंबईच्या दीप्तीताई पाटील, वंश चिंदा आणि पुष्कर पुष्प यांचा प्रमुख सहभाग आहे.

Leave a Reply