
वर्मा परिवाराकडून सडावनच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावन येथे वर्मा परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
अमळनेर येथील अर्चना गिरीश वर्मा आणि त्यांचे सुपुत्र कृष्णा गिरीश वर्मा यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगा व पेनचे वाटप केले. उपशिक्षिका वैशाली पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या या मदतीबद्दल वर्मा परिवाराचे आभार मानले. तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळते, असे मनोगतात सांगितले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक एस. बी. पाटील, एस. आर. पद्ममार, उपशिक्षिका वैशाली पाटील, भारती पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply