
पैलाड भागातील तुटलेली लोखंडी जाळी ठरली ‘मृत्यूचा सापळा’; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा
मुख्य रस्त्यावरील नाल्यावरची जाळी महिनाभरातच तुटली; प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत संताप

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पैलाड भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये संत सखाराम महाराज संस्थानकडून पारोळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मोठ्या नाल्यावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी पूर्णपणे तुटल्याने या ठिकाणी ‘मृत्यूचा सापळा’ निर्माण झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी बसविण्यात आलेली ही जाळी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ती तुटल्याचे सांगितले जात आहे. परिणामी या ठिकाणी कधीही गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा मार्ग शहरातील प्रमुख आणि वर्दळीचा रस्ता असल्याने येथे दिवसरात्र वाहनांची ये-जा सुरू असते. नाल्यावरील मोठ्या कटरमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना तुटलेली जाळी दिसत नसल्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा संबंधित लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकभावना आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप वाढत आहे.
“आम्ही प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की, कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही लोखंडी जाळी तातडीने दुरुस्त करण्यात यावी. जर नगर परिषदेने लवकरात लवकर यावर उपाययोजना केली नाही, तर आम्ही सर्व नागरिक मोठ्या संख्येने नगर परिषदेवर तीव्र मोर्चा काढू. तसेच, येथे कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याला संपूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.”
असा इशारा गोलू धनगर, सागर पाटील, सुजित पाटील, शरद भोई, गुड्डू शिरसाठ, राज भिल, सुभाष भिल आणि विशाल बिऱ्हाडे यांनी दिला आहे.
अवघ्या एका महिन्यापूर्वी बसविण्यात आलेली जाळी एवढ्या कमी कालावधीत तुटल्याने तिच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या निकृष्ट कामामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणार की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच जाग येणार, याकडे संपूर्ण पैलाड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जाळीसह स्पीड ब्रेकर बसवून प्रश्न मार्गी लावू
“आम्ही आमच्या प्रभागात लोखंडी जाळी बसवली होती. परंतु पुढील पुलाजवळ काम सुरू असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने अवजड वाहनांची वाहतुकी केल्यामुळे ती जाळी तुटलेली आहे. त्यांच्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिकांना त्रास होत आहे, तसे आम्ही नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच त्या ठिकाणी जाळीसह स्पीड ब्रेकर बसवून हा प्रश्न मार्गी लावू.”
– पुष्पा पंकज भोई (नगरसेविका, प्रभाग क्र. १२)
लवकरच नवीन लोखंडी जाळी बसवू
“आमच्या भागातील रस्त्यावरील लोखंडी जाळी अवजड वाहनांमुळे तुटलेली आहे. ती दुरुस्तीसाठी आम्ही नगरपरिषदकडे पाठपुरावा केला आहे, लवकरच नवीन लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.”
– सुयोग ज्ञानेश्वर धनगर (नगरसेवक, प्रभाग क्र. १२)

Leave a Reply