फेक ई-मेलद्वारे महिला शासकीय अधिकाऱ्याची बदनामी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  फेक ई-मेल आयडी तयार करून एका महिला शासकीय अधिकाऱ्याचे तसेच त्यांच्या अधिकारी पतीचे नाव जोडून वैयक्तिक स्वरूपाचे फोटो, कथित चॅट आणि बदनामीकारक मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्याप्रकरणी दोषींविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी जळगाव पोलीस अधीक्षक आणि सायबर पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समाजसेवक जितेंद्र ठाकूर यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दि. ६ जुलै २०२६ रोजी काही अज्ञात व्यक्तींनी विविध फेक ई-मेल आयडींचा वापर करून अमळनेर शहरातील अनेक नागरिकांना संबंधित महिला अधिकाऱ्याचे वैयक्तिक स्वरूपाचे फोटो, कथित चॅट तसेच बदनामीकारक मजकूर ई-मेलद्वारे पाठविला. या प्रकारामुळे संबंधित अधिकारी दाम्पत्याची, त्यांच्या कुटुंबाची तसेच सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठेची गंभीर हानी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात संबंधित फेक ई-मेल आयडींचे आयपी ॲड्रेस, ई-मेल हेडर, सर्व्हर लॉग्स तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्यावा, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी ॲक्ट) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच भविष्यात अशा प्रकारे कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याशी, प्रतिष्ठेशी आणि कुटुंबाशी खेळ करणाऱ्या व्यक्तींना कायद्याचा कठोर धाक बसावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जितेंद्र ठाकूर यांनी या तक्रारीसोबत कथित चॅटचे स्क्रीनशॉट, प्रसारित करण्यात आलेले फोटो, फेक ई-मेलचा स्क्रीनशॉट, संबंधित ई-मेलच्या सीसी/रिसिपियंट लिस्टचे स्क्रीनशॉट तसेच इतर उपलब्ध डिजिटल पुरावे जोडले असल्याचे नमूद केले आहे. या सर्व पुराव्यांचे फॉरेन्सिक परीक्षण करून संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी (अमळनेर विभाग) आणि पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस ठाणे यांनाही माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *