
निसर्डी शिवारात अवैध मुरूम वाहतुकीवर धडक कारवाई; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निसर्डी शिवारात अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुरूमासह डंपर असा एकूण ९ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निसर्डी परिसरात अवैध मुरूम वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मंडळाधिकारी संजय धोंडू चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार फिरोज बागवान, हेडकॉन्स्टेबल प्रवीण पारधी आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने निसर्डी शिवारात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान एमएच २० ईएल २३५५ क्रमांकाचा डंपर अवैधरित्या मुरूम वाहतूक करताना आढळून आला. पथकाने वाहनाची तपासणी करून डंपरसह मुरूम जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ५९ हजार ६०० रुपये असल्याचे महसूल विभागाने सांगितले. चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव आलिमखान सलीमखान पठाण (वय २७, रा. अमलेश्वर नगर) असे सांगितले. याप्रकरणी मंडळाधिकारी संजय धोंडू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आलिमखान सलीमखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत. महसूल विभागाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply