
अजितदादांचा पुतळा शेतकऱ्यांना प्रेरणा, ऊर्जा व वक्तशीरपणाची शिकवण देईल : आमदार अनिलदादा पाटील
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी रूपात बैलगाडी हाकतानाचा स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला शेतकरी प्रेरणा स्मारक पुतळा उभारण्यात आला असून, हा पुतळा शेतकऱ्यांना कामाची ऊर्जा, धैर्य आणि वक्तशीरपणाची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले.
स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती अशोक पाटील आणि संचालक मंडळाने हे स्मारक उभारले आहे.
याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा या उद्देशाने बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटनही आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना केवळ शासकीय शुल्कामध्ये विविध शासकीय ऑनलाइन योजनांसाठी अर्ज व आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कार्यक्रमात बोलताना सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, स्वर्गीय अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांच्या विचारांमुळे आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकरी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच बाजार समितीमध्ये बांधकामाधीन असलेल्या व्यापारी संकुलाला स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांचे नाव देण्याचाही मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पिरण पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष गणेश भामरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील, सुषमा देसले, भोजमल पाटील, समाधान धनगर, भाईदास भिल, डॉ. अनिल शिंदे, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश अमृतकार, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिंदे, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, प्रा. मंदाकिनी भामरे, रिता बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, कविता पवार, नगरसेविका शोभाताई गढरे, सुरेश विक्रम पाटील, एल. टी. पाटील, नगरसेवक राजू फापोरेकर, जितू ठाकूर, गटसचिव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, मुख्तार खाटिक, हेमंत पवार, जितेंद्र झाबक, निलेश भांडारकर, अनिल अहिरराव, दिनेश शेलकर, अलीम मुजावर, गौरव पाटील तसेच बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी मानले.

Leave a Reply