
भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीवर हल्ला; बोहरा येथे मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) दोन जणांतील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दि. ३० रोजी बोहरा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय भिमराव भिल (वय ४५, रा. बोहरा) हे सायंकाळी सुमारे ६ वाजता दिलीप रामदास कोळी यांच्या किराणा दुकानासमोर उभे होते. यावेळी शेजारीच राजेंद्र वर्णेश्वर कोळी आणि शेखर अंतोष मेहेरे यांच्यात वाद होऊन भांडण सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून संजय भिल यांनी दोघांना समज देत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शेखर मेहेरे याने “आमच्या भांडणात पडू नको” असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संजय भिल हे कैलास भोजू भोई यांच्या घरासमोर जाऊन बसले असताना रात्री सुमारे ८ वाजता शेखर मेहेरे आणि त्याचा भाऊ सागर संतोष मेहेरे यांनी तेथे येऊन पुन्हा शिवीगाळ करत हल्ला चढवला. दोघांनी “तू आमच्या भांडणात का पडलास” असे म्हणत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शेखर मेहेरे याने जमिनीवर पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली व नाकाजवळ मारून जखमी केले. तसेच सागर मेहेरे यानेही शिवीगाळ करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या संजय भिल यांना उपस्थित नागरिकांनी सोडवून तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply