
अमळगावच्या ‘आदर्श’ विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा; विज्ञान प्रयोगशाळेला नवसंजीवनी!
१९९७, २००३ आणि २००५ च्या बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा; शाळेला प्रयोगशाळा साहित्य व पंख्यांची भेट

अमळनेर (प्रतिनिधी ),अमळगांव दि. २ मे २०२६ : काळ पुढे सरकत असला तरी शालेय आठवणींचा सुगंध कायम मनात दरवळत राहतो, याचा प्रत्यय शनिवारी अमळगाव येथील ‘आदर्श’ विद्यालयात आला. इयत्ता ४ थी (१९९७), १० वी (२००३) आणि १२ वी (२००५) च्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींमुळे संपूर्ण परिसर आनंद, हास्य आणि आठवणींनी भारावून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग विठ्ठल मराठे होते. विशेष म्हणजे, माजी तसेच सध्या कार्यरत शिक्षकवृंदाची लक्षणीय उपस्थिती लाभली. आपल्या शिष्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होताना पाहून शिक्षकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले. या स्नेहमेळाव्याने शिक्षक-विद्यार्थी नात्याची उब पुन्हा एकदा अधोरेखित केली.
या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी केवळ आठवणींना उजाळा न देता सामाजिक बांधिलकी जपण्याचा घेतलेला संकल्प. २००६ मधील महापुरात विद्यालयाची विज्ञान प्रयोगशाळा उद्ध्वस्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘आपल्या शाळेतील विद्यार्थी विज्ञानाच्या युगात मागे राहू नयेत’ या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेला अत्यावश्यक विज्ञान प्रयोगशाळा साहित्य तसेच प्रत्येक वर्गासाठी इलेक्ट्रिक पंख्यांची भेट दिली.
या उपक्रमात माजी विद्यार्थी हर्षल पुंजु पाटील यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली. या मदतीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण अधिक प्रभावीपणे घेता येणार असून, प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्यांची वैज्ञानिक दृष्टी अधिक सक्षम होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली. बालपणीच्या खोड्या, शिक्षकांचा धाक, शालेय जीवनातील प्रसंग आणि पुढील यशाचा प्रवास सांगताना वातावरण अनेकदा भावूक झाले. काहींनी आपल्या संघर्षकथा सांगितल्या, तर काहींनी शाळेने घडवलेल्या आयुष्याच्या वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
माजी विद्यार्थ्यांच्या या भेटीत केवळ आठवणींची देवाणघेवाण झाली नाही, तर समाजासाठी आणि पुढील पिढीसाठी काहीतरी देण्याची भावना अधिक दृढ झाली. विद्यालयाच्या विकासासाठी अशा प्रकारे एकत्र येणे हीच खरी माजी विद्यार्थ्यांची ओळख असल्याचे अनेकांनी नमूद केले.
या सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन दिपक श्रीराम पाटील, सुधाकर पारधी आणि विलास सुभाष चौधरी यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि खुसखुशीत शैलीने कार्यक्रमात रंगत वाढवली. श्रोत्यांनीही त्यास उत्स्फूर्त दाद दिली.
दुपारच्या स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. ‘पुन्हा भेटूया’ या आश्वासनासह आणि जुन्या आठवणींची शिदोरी मनात साठवत सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.
माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, विद्यालयाच्या विकासासाठी हा स्नेहमेळावा प्रेरणादायी ठरला आहे. जुन्या नात्यांना नवी उभारी देत, समाजाभिमुख कार्यातून आदर्श निर्माण करणारा हा मेळावा अमळगावच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात विशेष ठसा उमटवून गेला.

Leave a Reply