
शिवीगाळ करू नको सांगितल्याचा राग येऊन दोघांनी एकाला चाकू आणि फायटरने केली बेदम मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा येथे शिवीगाळ करू नको सांगितल्याचा राग येऊन दोघांनी एकाला चाकू आणि फायटरने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १० रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रमोद बापूराव सैंदाणे (वय ४३ रा. निंभोरा) हे आपल्या घरात असताना बाहेर कृष्णा बाळू भिल व रोहित अरुण वाघ हे दोघे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत होते. त्यावेळी प्रमोद त्यांना म्हणाला की, इथे बाया आहेत शिवीगाळ करू नका. असे बोलण्याचा राग येऊन कृष्णाने खिश्यातील चाकू काढून प्रमोदला मारू लागला. प्रमोदने तो वार तळहातावर घेतल्याने त्याच्या तळव्याला जखम होऊन रक्त वाहू लागले. त्याच्या हातातील चाकू खाली पडताच त्याने खिश्यातून फायटर काढले आणि प्रमोदच्या कपाळावर मारले. लगेच रोहित आला आणि त्याने पाठीवर , पायावर लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी प्रमोदची पत्नी आणि वहिनी दोघांनी भांडण आवरण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर प्रमोदला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कृष्णा आणि रोहित यांच्याविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५, ३५२ ,३५१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय श्रावण पाटील करीत आहेत.

Leave a Reply