
अमळनेरात पहाटेचे कोंबिंग ऑपरेशन; १२ वाँटेड आरोपी जेरबंद, गुटखा, हातभट्ट्या व गावठी कट्ट्यावर मोठी कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलिसांनी २ जुलै रोजी अमळनेर शहरात पहाटे व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत १२ वाँटेड आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई, सात गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. दरम्यान, चोपडा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, भगवान शिरसाठ, कविता ठाणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र वलटे यांच्यासह तीन आरसीपी पथके, अमळनेर डीबीचे ५० कर्मचारी, उपविभागातील ३० कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे १२ कर्मचारी तसेच चोपडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबविली. पहाटे साडेतीन ते सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत ही कारवाई सुरू होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी ११० सराईत गुन्हेगारांच्या घरांची तपासणी केली. त्यापैकी ७० गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी आढळून आले. त्यातील ५२ जणांची नोंद करून त्यांना समज देण्यात आली. न्यायालयात गैरहजर असलेल्या सहा आरोपींना अटक वॉरंट बजावून ताब्यात घेण्यात आले, तर १२ वाँटेड आरोपींनाही अटक करण्यात आली.
गुटखा विक्रीविरोधातील कारवाईत आकाश बाबूलाल सोनवणे (वय २०, फरशी रोड) याच्याकडून सुमारे २० हजार रुपयांचा, तर सुगणामल किसनचंद बठेजा (वय ७५, सिंधी कॉलनी) याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याशिवाय सानेनगर, म्हाडा कॉलनी, पिळोदा, चांदणी, कुऱ्हे, कंजरवाडा, पिंपळी आणि पैलाड परिसरातील सात गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत सुमारे सव्वा लाख रुपयांची गावठी दारू व दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. हातभट्ट्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या.
दरम्यान, चोपडा येथे संभाजीनगरकडून गावठी कट्टा घेऊन वाहन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. या कारवाईत ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (रा. कुर्हाड, ता. पाचोरा), सचिन रोशन पवार आणि अनिल कचरे साळुंखे (रा. गंगापूर, संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा गावठी कट्टा, १० हजार रुपयांचे मॅगझीन तसेच सुमारे पाच लाख रुपयांची एमएच- २०- ईई-६१०३ क्रमांकाची कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply