
मुसळधार पावसाने जोशीपुरा जलमय; रस्त्यावर साचला तलाव, घरांमध्ये शिरले पाणी, गटारीच्या छोट्या पाईपमुळे समस्या
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः जोशीपुरा परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले, तर कचेरी रोडवरील शिव पेट्रोलियमसमोरही रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले. मात्र, जोशीपुरा परिसरात परिस्थिती अधिक गंभीर होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, या समस्येमागे नुकत्याच करण्यात आलेल्या ढेकू रस्त्याच्या कामातील त्रुटी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. रस्त्याचे काम करताना गटारीसाठी लहान व्यासाचा पाईप टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाऊ शकत नाही. परिणामी, पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरच साचते आणि तलावासारखी परिस्थिती निर्माण होते. नवीन रस्ता पूर्वीपेक्षा उंच झाल्यामुळे परिसरातील काही घरे तुलनेने खाली गेली आहेत. त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस थांबल्यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांत पाण्याचा निचरा होत असला, तरी तोपर्यंत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी सांगितले की, गटारीसाठी टाकण्यात आलेला पाईप लहान असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे. हा पाईप मोठ्या व्यासाचा बसविण्याबाबत बांधकाम विभागाला कळविण्यात आले असून, लवकरच आवश्यक कार्यवाही करून समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात येईल. दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्यात अशा ठिकाणी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply