आगीत अमळनेरचा वारसा आणि इतिहास जळाला… पण नगराध्यक्षांची पावले घटनास्थळी वळलीच नाहीत!

संत सखाराम महाराज वाडीतील भीषण आगीत नेतृत्वाच्या अनुपस्थितीची चर्चा

अमळनेर (प्रतिनिधी ) संत सखाराम महाराज वाडी संस्थानातील भीषण आगीत शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि ऐतिहासिक वारसा जळून खाक झाला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर हळहळ व्यक्त करत असताना, शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर घटनास्थळी न आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

अशा गंभीर प्रसंगी नगराध्यक्षांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणे आणि प्रशासनाला आवश्यक सूचना देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून, शहराच्या इतिहासाशी आणि भावनांशी निगडित घटनेत नेतृत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित प्रभागातील नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. नगराध्यक्षांचे नगरसेवक,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक अनिल (आबू )महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदनशिव, पंकज भोई, सूरज परदेशी, प्रताप साळी, नाना धनगर,नाविद शेख, हे मदतकार्यात पुढे सरसावले, ही बाब कौतुकास्पद असली तरी शहराच्या प्रथम नागरिकांची उपस्थिती अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेत अग्निशामक दलाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगीची माहिती मिळूनही अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. त्यानंतरही पाण्याचे पाईप जोडताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, पाईप वारंवार सटकत असल्याने आग विझविण्याच्या कामात अडथळे आले. पालिकेच्या अखत्यारीतील अग्निशामक यंत्रणेच्या देखभालीबाबत आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या तयारीबाबत यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ही बाब कोणत्याही राजकीय चिखलफेकीची नसून, शहराच्या सुरक्षिततेशी, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेशी आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीशी संबंधित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संकटाच्या काळात राजकारणापेक्षा संवेदनशील नेतृत्व, तत्पर प्रशासन आणि प्रभावी आपत्कालीन यंत्रणा अधिक महत्त्वाची असते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संत सखाराम महाराजांची पायी दिंडी अवघ्या काही किलोमीटरवर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने भाविकांच्या भावना अधिकच दुखावल्या आहेत. संस्थानाचे झालेले नुकसान भरून काढणे कठीण असले तरी या ऐतिहासिक व पवित्र स्थळाच्या पुनर्बांधणीसाठी सर्व समाजाने एकजुटीने पुढे यावे, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संत सखाराम महाराजांच्या कृपेने संस्थानला लवकर उभारी मिळो आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच अमळनेरकरांची प्रार्थना आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *